बंदोबस्तात कारवाई चित्रीकरणही केले जाणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक लाखांच्या वर थकबाकीदारांना संपूर्ण थकबाकीसह मिळकत कर भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतर आठ दिवसांच्या आत बिल भरले नाही तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, आजपासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
शहरात एकूण 5 लाख 25 हजार मिळकतीची नोंद आहे. त्यातील 1 लाखांवर थकबाकी असलेल्या निवासी व अनिवासी मिळकतधारकांची यादी तयार करण्यात आली आहे. ही संख्या तब्बल 19 बजार 593 इतकी आहे. त्यांना थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर 8 दिवसांच्या आत भरण्याच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. पाच लाखांवरील थकबाकीदारांची संख्या 3 हजार 602 इतकी आहे. चिखली करसंकलन कार्यालयामध्ये सर्वाधिक 781 थकबाकीदार आहेत. त्यापाठोपाठ थेरगाव कार्यालयात 333 थकबाकीदार आहेत. सांगवी कार्यालयात 269, तळवडे कार्यालयात 260, चिंचवड कार्यालयात 226 थकबाकीदार आहेत. निगडी प्राधिकरण 83, आकुर्डी 155, पिंपरी गाव 115, पिंपरी कॅम्प 64, चऱ्होली 91, मोशी 168, किवळे 111 असे थकबाकीदार आहेत.
थकबाकीदार मिळकतधारकांना थकबाकीसह संपूर्ण मिळकतकर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर न भरल्यास सोमवार (दि. 17) पासून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये मध्यवर्ती अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाचे पथकही सहभागी होणार आहे. मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास बांधकाम पाडण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात केली जाणार आहे. त्याचे चित्रीकरणही केले जाणार आहे.