ग्रामस्थांच्या रेट्यामुळे कंपनीवर होणार कारवाई

तलावात सोडलेले सांडपाणी भोवले : तहसीलदार शेख यांचे आश्‍वासन

केंदूर – पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील प्रथम एचपीसीएल कंपनीने केमिकल मिश्रणरहित दूषित सांडपाणी गावच्या पाझर तलावात पाइपलाईनद्वारे सोडल्यामुळे तलावातील मासे मृत पावल्याचे सामोर आले होते. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रेटा लावल्यामुळे महसूलची यंत्रणा सक्रिय झाली. मंडलाधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर तहसीलदार एल. डी. शेख यांनी कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पिंपळे जगताप येथील गायरान भागात असलेल्या पाझर तलावाच्या बाजूला मोठा खड्डा खोदून त्यात पाइपलाइनद्वारे सलग सात ते आठ दिवसांपासून एचपीसीएल कंपनीने दूषित पाणी सोडले. त्या खड्ड्यात पाणी जादा झाल्याने हे प्रदूषित पाणी थेट पाझर तलावात गेल्याने तलावातील मासे मृत पावले होते.

तलावामध्ये मत्स्यबीज सोडून मत्स्यपालन करण्याचे कंत्राट गावातील शेतकरी रमेश नाथोबा दौंडकर यांना मिळाले आहे. दौंडकर हे तलावात मत्स्यबीज सोडून उदरनिर्वाह करत आहेत. परंतु तलावात कंपनीने दूषित पाणी सोडल्याने तलावातील मासे मृत पावल्याने दौंडकर हवालदिल झाले होते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महसूलकडे कार्यवाहीबाबत आक्रमक पाठपुरावा केला होता. मंडलाधिकारी ढवळे यांच्याकडे तक्रार करून प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली.

ढवळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तहसीलदार शेख यांच्याकडे पंचनामा अहवाल पाठवला. त्यानंतर मंडलाधिकारी ढवळे यांनी पंचनामा केला आहे. यापूर्वीही अनेकवेळा ग्रामपंचायतीने हद्दीतील सर्व कंपन्यांना सांडपाण्याची व्यवस्था करण्याचे वारंवार पत्रकाद्वारे कळविले होते. मात्र, कंपनी प्रशासनाने जबाबदारी झटकली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर तहसीलदार एल. डी. शेख यांनी कारवाई करण्याचे
आश्‍वासन दिले आहे.

तलावात गेलेले पाणी दूषित नसून ते फक्‍त टेस्टिंग वॉटर आहे. आमच्याकडे अजूनपर्यंत शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी संपर्क केला नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण माहिती घेऊन सांगतो.
-नितीन दलाल, मॅनेजर, एचपीसीएल कंपनी.

मंडलाधिकारी चंद्रकांत ढवळे यांच्याकडून माहिती आणि पंचनामा अहवाल मागवून घेणार आहे. कंपनीला त्वरित नोटीस बजावून कडक कारवाई करू.
-एल. डी. शेख, तहसीलदार, शिरूर.

Leave A Reply

Your email address will not be published.