परीक्षेआधीच व्हॉट्सअपवर दहावीच्या पेपरफुटी प्रकरणी अटकेची कारवाई

भिवंडी – दहावीच्या परीक्षेचे पेपरफुटी प्रकरणी भिवंडी येथील नारपोली पोलिसांनी कारवाई करत इंतेखाब पटेल याला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी दहावीच्या समाजशास्त्र आणि विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी खासगी क्लास चालवणाऱ्या हाफिजूर वजीर रेहमान शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. न्यायालयाने त्याला २६ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी पुढील कारवाई करत आज इंतेखाब पटेल याला अटक केली आहे. इंतेखाब पटेल आणि हाफिजूर वजीर रेहमान शेख हे एकमेकांच्या संपर्कात होते असे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. आपल्या खासगी क्लास मध्ये असणाऱ्या मुलांना  इंतेखाब पटेल हा परीक्षेआधीच पेपर वितरित करत असे. तसेच विद्यर्थ्यांच्या पालकांकडून एका पेपरसाठी ३००० रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे पेपर परीक्षेआधीच सोशल माध्यमांवर झळकल्याने एकच खळबळ उडाली होती. समाजशास्त्र विषयाचा पेपर, परीक्षा सुरु होण्याआधीच अर्धा तास अगोदर व्हॉट्सअप या सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता. तसेच १५ मार्च आणि १८ मार्च रोजी झालेल्या विज्ञान विषयाचा पेपर फुटल्याचे देखील समोर आले होते. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे शेतकरी उन्नती मंडळाच्या परशुराम धोंडू तावरे विद्यालयातील आणि राहणाल येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूल मधील विद्यार्थ्यांच्या मोबाईल मध्ये परीक्षा सुरु होण्याआधीच पेपर आढळून आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.