नवी दिल्ली : ज्ञानवापी मशीद प्रकरण न्यायालयात सुरु असताना बनारसमध्ये वाजू खाताना सापडलेली आकृती शिवलिंग म्हणून साधुसंतांनी स्वीकारली आहे. त्यामुळे त्या शिवलिंगाचाच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या पूजेसाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी श्री विद्या मठाचे स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी आग्रह धरला होता.. मात्र ही जागा न्यायालयाच्या आदेशाने सील करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना जाण्यास आधीच नकार दिला होता.
दरम्यान, स्वामी अभिमुक्तेश्वरानंद यांनी ज्ञानवापी मशिदीत पूजा करण्याचा इशारा दिला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत अभिमुक्तेश्वरानंद यांना नजरकैदेत ठेवले आहे. अभिमुक्तेश्वरानंद यांच्या विद्यामठाबाहेर मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
स्वामी अभिमुक्तेश्वरानंद म्हणाले, “मी प्रशासनाला वारंवार विनंती करतो आहे की आम्हाला ज्ञानवापी मशिदीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना मागे ठेवलं आहे. केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी.”
“प्रशासनाने १०० कोटी सनातन धर्मियांची भावना समजून घ्यावी. देवाचा पूजा करून घेण्याचा अधिकार रद्द करू नये,” असं मत अभिमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केलं.