महिला तलाठ्याची मुजोर वाळू तस्करावर कारवाई

संगमनेर  – वाळू तस्करांकडून महसुल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना होत असतांना मात्र संगमनेर तालुक्‍यातील सांगवीच्या महिला तलाठी सुरेखा विश्वनाथ कानवडे यांनी वाळू तस्करांना भीती बसावी, अशी कारवाई करून दाखवली आहे.

संगमनेर तालुक्‍यात वाळू तस्करांची मुजोरी सुरूच असून, गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सांगवी येथून नांदुरी दुमाला येथे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी महिला तलाठी सुरेखा कानवडे जात होत्या. त्यांना प्रवरा नदीपात्रातून धांदरफळ खुर्द ते नांदुरीदुमाला येथून अवैधरित्या विनापरवाना अमोल दिलीप वाकचौरे (रा.धांदरफळ बुद्रुक) हा एका ट्रॅक्‍टरमधून वाळूची चोरटी वाहतूक करत असताना दिसला.

कानवडे यांनी त्याकडे वाळू वाहतूकीच्या परवानाबाबत विचारणा केली. वाकचौरे याने कानवडे यांना तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या, मी तहसील कार्यालयात येणार नाही. तुमच्याकडे नंतर पाहून घेतो’, असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. वाकचौरे याने नांदुरी दुमालाकडे ट्रॅक्‍टर जोरात पळवून नेला. त्यानंतर महिला तलाठ्याने संबधित घटना तहसीलदार अमोल निकम यांना सांगितले. तहसीलदार निकम यांच्या आदेशानंतर कामगार तलाठी उमेश देवधडे व पोमल तोरणे यांनी नांदुरी दुमाला येथे जात कानवडे यांच्या मदतीने ट्रॅक्‍टर ताब्यात घेतला.

दरम्यान याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह व दीड हजार रुपये किंमतीची अर्धा ब्रास वाळू मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अमोल वाकचौरे व अज्ञात तीन इसम यांच्या विरुद्ध अवैध उत्खनन, शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ, दमदाटीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र सहाणे हे करत आहेत. कानवडे यांनी राजकीय दबावाला न जुमानता वाळू तस्करावर केलेल्या कारवाईची चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.