पुणे – खंडणीच्या गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे फरारच आहे. त्याच्यावर पुण्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत 12 गुन्हे दाखल आहेत. बऱ्हाटे सापडत नसल्याने त्याच्या साडेतीन हजार कोटी रुपयांचे मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.
न्यायालयाच्या परवानगीनंतर कोथरुड पोलिसांनी याबाबत प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बऱ्हाटेच्या मालमत्तेबाबत आयकर विभागास माहिती देण्यात आली असून, वेगवेगळी बांधकामे, जागा खरेदी-विक्रीचे दस्तावेज जप्त करण्यात येत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात विशाल ढोरे (36), अस्लम पठाण (24), सचिन धिवार (32), परवेज जमादार (39) व बालाजी लाखाडे (27) या पाच जणांना युनिट-5 चे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या पथकाने नंदुरबार येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींकडून रोख रकमेसह, इनोव्हा कार, निस्सान कार, विविध मोबाइल-सिमकार्ड जप्त केले आहेत. आरोपी विशाल ढोरे हा इतर चार आरोपींना सोबत घेऊन पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, नंदुरबार आदी ठिकाणी लपुन गुंगारा देत होता.
बऱ्हाटेसह इतर आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात संबंधित आरोपी मागील पाच महिन्यांपासून फरार होते. विशेष सत्र न्यायालयाने सदर आरोपी पकडण्यासाठी वॉरंट काढलेले होते. आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण 13 पैकी 11 आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, पाच जणांना न्यायालयात हजर केले.
त्यावेळी सर्वांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी केली. त्यानुसार विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.