पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- रहिवासी भागात बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विमानतळ पोलिसांनी चार फटका विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.
फटका विक्री दुकानांना अटी व शर्तींच्या पूर्ततेवर अग्निशमन दल, महापालिका, तसेच पोलिसांकडून परवानगी दिली जाते. शहराच्या मध्यभागातील वर्तक बाग, गोळीबार मैदान परिसरात परवाना दिलेली फटाके विक्री दुकाने आहेत.
दिवाळीची सांगता होईपर्यंत तेथे अग्निशमन दलाचे जवान आणि बंबही ठेवण्यात येतो. उपनगरांतील काही विक्रेत्यांनी बेकायदा फटाका विक्री दुकाने उघडल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
नगर रस्त्यावरील फिनिक्स माॅलजवळील परिसरात सुरू असलेला फटाका स्टॉलचालक, लोहगावमधील संतनगर परिसरातील गुरुराज फटका मार्ट, संतनगर परिसरातील महालक्ष्मी फटाका मार्ट, तसेच लोहगावमधील भाजी मंडई परिसरातील एकदंत फटका स्टाॅलच्या मालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भारतीय नागरिक संहिता सुरक्षा २०२३ चे कलम ३५ (३) अन्वये पोलिसांनी फटाका विक्रेत्यांना नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली.
विमाननगर, लोहगाव भागातील बेकायदा फटका विक्री दुकाने काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. फटाके जप्त करून पोलीस ठाण्यात ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांनी फटाके जप्तीपेक्षा थेट दुकानमालकांना समज देऊन फटाक्यांसह दुकानच काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
रहिवासी भागात परवानगीशिवाय फटाका विक्री दुकाने सुरू करणाऱ्या दुकानमालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. कारण तिथे आग लागल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. पोलीस, महापालिका प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदा फटका विक्रीची दुकाने आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित पोलिसांकडे तक्रार द्यावी. – हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार