पिंपरी – मैलामिश्रित सांडपाणी आणि केमिकलयुक्त सांडपाणी ड्रेनेजलाइनच्या मार्फत थेट इंदायणी नदीत सोडले जात होते. याबाबत चिखली, शेलारवस्ती तसेच निघोजे परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करून देखील महापालिकेचे अधिकारी दखल घेत नव्हते. परंतु दैनिक प्रभातने सोमवार (दि. 23) “इंद्रायणीच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे नदीकाठची शेती धोक्यात’ वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या जलनिःसारण विभागाने चिखली परिसरात पाहणी केली. त्यानुसार कंपन्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
इंद्रायणी नदीमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे नदीतील प्रदूषण वाढल्याच्या अनुषंगाने जल निःसारण विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि दै. प्रभातच्या वृत्तानंतर शुक्रवार (दि. 27 रोजी चिखली परिसरात पाहणी केली. तेव्हा केमिकलयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत जात असल्याने नदी प्रदूषणाबरोबरच जलजीवन धोक्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दै. प्रभातच्या वृत्तामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. पाहणी करून दोषींवर कारवाई केली. यामुळे शेलारवस्ती, निघोजे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रभातचे आभार मानले आहेत.
गळतीवर उपाययोजना सुरू
चिखली, शेलारवस्ती परिसरात ड्रेनेजलाइन गळती सुरू आहे. सध्या महापालिकेच्या जलनिःसारण विभागाकडून चिखली परिसरातील ड्रेनेजलाइनच्या गळती होत असलेली ठिकाणे शोधून दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे ड्रेनेजलिकेज काढून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
शेलारवस्ती परिसरातील उद्योजकांना अनधिकृत/ विनापरवाना बांधकामाचे अनुषंगाने सदर विनापरवाना बांधकामे काढून टाकण्यासाठी नोटीस दिल्या आहेत. इंद्रायणी नदीच्या काठी भराव करून अनधिकृत शेड, इमारती बांधण्याचे काम बेकायदेशीरपणे सुरू आहे. सदर विनापरवाना बांधकामे, शेड बांधकाम करणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात येईल. तसेच विनापरवाना बांधकाम तोडण्यात येतील.
– सीताराम बहुरे, “फ’ क्षेत्रीय अधिकारी.
ड्रेनेजलाइनलाच जोड
या उद्योजक कंपन्यांचे सांडपाण्याच्या पाइपचे कनेक्शन जलनि:सारण विभागाची कोणतीही परवानगी न घेता महापालिकेच्या ड्रेनेजलाइनला जोडल्याचे पाहणी केली असता निदर्शनास आले. तसेच, पुढील आठवड्यात सुद्धा सदर भागात तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, मिळकतींचे सांडपाणी/ रासायनिक सांडपाणी विनापरवाना महापालिकेच्या ड्रेनेजलाइनला जोडल्याबद्दल सदर व्यावसायिकांच्या विरोधात महाराष्ट्र महापालिका अधिनियम 186 (1) (क) नुसार चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
जोडणीसाठी परवानगी आवश्यक
महापालिकेच्या ड्रेनेजलाइनला कोणत्याही मिळकतीचे ड्रेनेज कनेक्शन करण्यापूर्वी नोदणीकृत प्लंबरच्या मार्फत नागरी सुविधा केंद्रामध्ये परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या ड्रेनेजलाइनमध्ये रासायनिक सांडपाणी जोडणे बेकायदेशीर आहे. सदर उद्योजकांना पर्यावरण कायद्यान्वये सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सोडत असल्याबद्दल पर्यावरण कायद्याचे अनुषंगाने नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर भागात भेट देऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करण्याबाबत पाऊल उचलले आहे.
नागरिक, उद्योजकांनी कोणत्याही प्रकारचे विनापरवाना बांधकाम करू नये. बांधकाम करण्यापूर्वी रितसर परवानगी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– रामदास तांबे, सह शहर अभियंता.
या कंपन्यांवर झाली कारवाई
मारूती लोंढे (गट क्र. 1560, क्वालिटी कोटींग वर्क्स शेलरवस्ती, चिखली).
कुमार मोहन प्रजापती (गट क्र. 1561, डायनॅमिक प्लॅस्टिक इंडस्ट्रीज शेलारवस्ती, चिखली).
मोरेश्वर मुंगसे (गट क्र. 1555, ओम इंडस्ट्रीज, शेलारवस्ती चिखली).
सचिन साठे (गट क्र. 1555, वरद इन्फोटेक शेलारवस्ती, चिखली).
सुरेश अग्रवाल (गट 1555, हरीदर्शन प्रा. लि. शेलारवस्ती, चिखली).
विश्वेश देशपांडे (गट क्र. 1562 प्लॉट 12, टेक्सेव्ही मेकॅनिकल, शेलारवस्ती, चिखली).