माळेगाव गोळीबार प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई….

जळोची- बारामती तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अवघ्या पंधरा दिवसात सदर प्रकरणाचा तपास करून मोक्कांतर्गत कारवाई केल्याची ही बारामतीतील पहिलीच घटना आहे.

काय आहे प्रकरण….

दिनांक ३१ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रविराज तावरे हे पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासोबत बारामती तालुक्यातील माळेगाव येथील संभाजीनगर येथे स्वत:च्या मोटारीतून गेले होते. तेथे वडापाव घेत त्यानी वडापाव विक्रेत्याला पैसे दिले. गाडीकडे येत असताना दुचाकीहून आलेल्या दोघानी त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी रविराज यांच्या छातीत घुसली होती.जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ येथील एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

याप्रकरणी पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांनी फिर्याद दिली होती.सदर गोळीबार प्रकरण हे फिर्यादी रोहिणी तावरे यांनी केलेल्या विकास कामाचा रोष तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी धमकावण्याचा प्रयत्न करून राजकीय व आर्थिक फायदा मिळवण्याच्या हेतूने फिर्यादीचे पती रविराज तावरे यांना संपवून दहशत निर्माण करत कट रचून अल्पवयीन मुला मार्फत गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणातील आरोपींवर या आधीच खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, असे संघटितपणे केलेले 9 गंभीर स्वरूपातील गुन्हे दाखल आहेत .

मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे….

प्रशांत पोपटराव मोरे (वय,४७.रा. माळेगाव कारखाना, शिवनगर,ता.बारामती), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबल कृष्णांंत यादव मोरे व एक अल्पवयीन अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे असून आरोपी क्रमांक याच्यावर ९, आरोपी क्रमांक २ वर ७, आरोपी क्रमांक ३ वर २ तर अल्पवयीनावर वर १ गुन्हा दाखल आहे.

सदर गोळीबार प्रकरण हे संघटितपणे गंभीर हिंसाचार करून त्यात घातक शास्त्राचा वापर करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यात संघटित गुन्हेगारी नियंत्रण  अधिनियमांचे वाढीव कलम लावण्या बाबतचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पोलिस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण,पो.ह सुरेश भोई, पोलीस नाईक सुरेश दडस, परीमल मानेर यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.