पुणे – करारात ठरल्याप्रमाणे काम न केल्यामुळे तडजोड झाल्यानंतर रक्कम परत करण्यासाठी दिलेला 5 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणात सबळ पुराव्या अभावी दोघांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पुराडउपाध्ये यांनी निर्दोष मुक्तता केली.
फिर्यादींने साडेसहा लाख रुपये धनादेशद्वारे दिल्याचे कथन केले आहे. मात्र, ते पैसे दिल्याचे फिर्यादी सिध्द करू शकले नाहीत. तसेच, दोन्ही आरोपी हे काम दिलेल्या कंपनीचे भागीदार असल्याचेही सिध्द झाले नाही.
मुधुरा देशमुख आणि विक्रम रणसुंभे या दोघांची मुक्तता झाली आहे. देशमुख यांच्यातर्फे ऍड. खंडेराव टाचले, ऍड. मनिष मगर यांनी, तर रणसुंभे यांच्या वतीने ऍड. गीता शिंदे यांनी काम पाहिले. 58 वर्षीय व्यक्तीने धनादेश बाऊन्सचा दावा न्यायालयात दाखल केला.
फिर्यादींच्या कथनानुसार आरोपी “एम.क्युबा डिझायनर किचन अँड इंटिरिअर’ नावाने इंटेरिअर डेकोरेटर्सचा व्यवसाय करतात. फिर्यादींचे म्हाळूंगे येथील रो-हाऊस फर्निचर आणि इंटिरिअर करण्याचे काम 13 लाख रुपयांना दिले होते. त्यातील 6 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश 24 जून 2014 रोजी दिला. त्याचे पैसेही प्राप्त झाले. 60 ते 90 दिवसात काम पूर्ण करून देणे करूनानुसार ठरले होते.
मात्र, मुदतीत काम झाले नाही. त्यामुळे फिर्यादींनी वकिलांमार्फत पाठविलेल्या नोटीसनंतर आरोपी आणि फिर्यादींमध्ये तडजोड झाली. केलेल्या कामाचे 1 लाख 25 हजार रुपये घेऊन उर्वरित 5 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश दिला. मधुरा देशमुख यांच्या वैयक्तीक खात्याचा असलेला हा धनादेश बाऊन्स झाल्याने हा दावा दाखल करण्यात आला.
फिर्यादींने रक्कम दिल्याचे आरोपींनी नाकारले. फिर्यादींनाही ते सिध्द करता आले नाही. तसेच केलेल्या करारनाम्यावर आरोपी एक अथवा दोनची स्वाक्षरी नसून, धनादेश आपलाच असल्याचे मधुरा यांनी मान्य केले. मात्र, सही नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.