ACP Vitthal Kubade: हिंगोली जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा गावचे सुपुत्र आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल दुसऱ्यांदा ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर झाले आहे. या सन्मानामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नक्षलग्रस्त भागापासून ते मोक्का कारवायांपर्यंतचा प्रवास – विठ्ठल कुबडे यांनी १९९३ मध्ये पोलीस सेवेत प्रवेश केला. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी नक्षलग्रस्त भागांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कामाची दखल घेऊन २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा ‘गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक’ देऊन गौरविण्यात आले होते. ACP Vitthal Kubade गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी पावले उचलली. विशेषतः तडीपार, मोक्का आणि स्थानबद्धतेच्या कारवायांमध्ये त्यांची भूमिका अत्यंत कळीची ठरली आहे. सध्या ते पिंपरी-चिंचवड येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून वाहतूक व इतर महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. मिळालेले पुरस्कार आणि सन्मान – कुबडे यांचा सेवाकाळ हा शिस्त आणि कर्तव्याचा आदर्श मानला जातो. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्यांनी १,२०० पेक्षा जास्त रिवार्ड्स मिळवले आहेत. साडेचारशेहून अधिक प्रशंसापत्रे त्यांच्या नावावर आहेत. २०१८ नंतर आता दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळवून त्यांनी स्वतःचा विक्रम अधिक अधोरेखित केला आहे. साखरा गावाला अभिमान – विठ्ठल कुबडे यांचे प्राथमिक शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण हिंगोली शहरात पूर्ण झाले. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या कुबडे यांच्या या यशामुळे साखरा गावासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ स्तरावरून कौतुक केले जात आहे. हेही वाचा – Todays TOP 10 News: डाॅ. बाबासाहेबांचे नाव टाळण्यावर मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण ते 350 प्रवाशांसह जहाज बुडाले.. वाचा आजच्या टाॅप बातम्या