नगराध्यक्षा माधवी कदम आणि पदाधिकाऱ्यांकडून भर पावसात पाहणी
सातारा – शहराच्या पूर्व भागात महत्वाच्या सर्किट हाऊस रस्त्यावर खड्डयांना उतारा म्हणून मुरूमाचे पॅचिंग करण्यात आले. मुरूमाने खड्डे भरल्यानंतरही पावसाच्या दणक्याने रस्त्यावर अक्षरशः चिखल झाला. पॅचिंगच्या या कामाची शुक्रवारी सकाळी नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्यासह सर्व सभापतींनी भर पावसात पाहणी केली.
साताऱ्यात गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना उरला असून सातारा शहरातील रस्त्यांची पावसाने अगदीच चाळण झाली आहे. पोवई नाका, कर्मवीर पथ, राधिका रोड या तिन्ही मार्गात खड्डे प्रचंड झाल्याने अपघातांचे धोके वाढले आहेत.
सदर बझार कॅप व जरंडेश्वर नाका यांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर रस्त्याची झेडपी ते सर्किट हाऊस दरम्यान अक्षरश : वाट लागली आहे. शरद पवारांच्या दौऱ्यातही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या वाहनांना याच मार्गावर प्रचंड त्रास झाला. रस्त्याच्या खचलेल्या साईडपट्टया व खड्डयांमध्ये साचून राहिलेले पाणी यामुळे हा रस्ता वाहनचालकांचा कपाळमोक्ष करणार यात शंका नाही. त्यामुळे नगराध्यक्ष माधवी कदम यांनी शुक्रवारी सकाळी तातडीने बांधकाम विभागाची बैठक बोलावून यंत्रणा सगळी सदर बझारच्या दिशेने वळविली. माधवी कदम यांच्यासह, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, बांधकाम सभापती सविता फाळके, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, आरोग्य सभापती विशाल जाधव यावेळी उपस्थित होते. पावसाची जोरदार सर सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा खडी अंथरून त्यावर मुरूम ओतण्याचे काम सुरू होते.
पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नाही त्यामुळे तात्पुरते मुरूमाने खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी झाल्यावर पॅचिंगची कामे हाती घेतली जाणार असून यामध्ये तीन प्रमुख रस्त्यांसह छोट्या मोठ्या बत्तीस मार्गाचा समावेश आहे. सातारकरांची दोन सणासुदीत अडचण होऊ नये याकरिता खासदार उदयनराजे भोसले यांच्या सुचनेनुसार ही पॅचिंगची कामे हातात घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष माधवी कदम यांनी दिली. याशिवाय सर्किट हाऊस ते आरटीओ मार्गाची सुद्धा त्यांनी पाहणी केली. मात्र जाड मुरूमाच्या थराने आणि वरून पावसाचा जोर यामुळे रस्त्यावर आणि कडेला अक्षरश : चिखल झाला होता. त्या चिखलातूनच जाण्याची वेळ पालिकेच्या पदाधिकाऱ्यांवर आली.