अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना दरमहा ५ हजार रुपये देणार – मध्यप्रदेश सरकारचा निर्णय

भोपाल – मध्य प्रदेश सरकारने आज अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना दरमहा ५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचा निर्णय राज्याचे नवनिर्वाचित सामाजिक न्यायमंत्री प्रेम सिंग पटेल यांनी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीदरम्यान घेतला.

प्रेम सिंग पटेल हे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सोमवारी  खातेवाटप केलेल्या २८ मंत्र्यांपैकी एक आहेत. या निर्णयाबाबत बोलताना पटेल म्हणाले, “राज्यात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मी मान्यता दिली आहे जेणेकरून ते सन्मानाने आपले जीवन जगू शकतील,”

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या पीडितांना लवकरच या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होणार असल्याचंही मंत्री महोदयांनी यावेळी सांगितलं. सद्यस्थितीत राज्यामध्ये अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना इतर दिव्यांगांप्रमाणे ६०० रुपये प्रतिमाह एवढी सरकारी मदत मिळते. आता यामध्ये वाढ केली जाणार आहे.

राज्य सरकारच्या स्पर्श पोर्टलवरील माहितीनुसार सध्या मध्य प्रदेशात अ‍ॅसिड हल्ला झालेले १७ पीडित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.