नागपूर – नागपुरात महिलेवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास शहरातील रामेश्वरी परिसरात घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. महिलेच्या पतीनेच हा हल्ला केल्याची माहिती समोर आली असून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही घटना घडली. सुरेश ठेंगणे (वय42) असे आरोपी पतीचे नाव आहे. वादामुळे दोन वर्षांपासून ते दोघे वेगळे राहत होते. त्यांना दोन मुले आहेत, ते महिलेकडे राहात होते. याच वादातून आरोपी सुरेशने पत्नीवर अॅसिड हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पीडित महिला सकाळी 11 वाजता तिच्या सायकलवरून रामेश्वरी भागातून जात होती. यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या आरोपी सुरेशने पीडितेवर अॅसिड हल्ला केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. पीडित महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. त्यादरम्यान पतीनेच महिलेवर अॅसिड हल्ला केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पती सुरेश ठेंगणेला अटक केली आहे. दोघांमध्ये नेमका वाद काय होता. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचचले याचा पोलिस तपास करत आहेत.