भरदिवसा तरुणावर ऍसिड हल्ला

पोलिसांनी घेतले संशयीत तरूणीला ताब्यात; तरूण गंभीर जखमी
प्रेम संबंधातून हा हल्ला झाल्याची चर्चा होत आहे

नगर – एकतर्फी प्रेमातून तरुणाकडून तरुणीवर ऍसिड हल्ला हे प्रकार आजवर झाले, परंतु तरुणीनेच तरुणावर ऍसिड फेकल्याची घटना आज नगर शहरात भरदिवसा वर्दळीचे ठिकाण असलेल्या प्रेमदान चौकातील एका हॉटेलमध्ये घडली. या ऍसिडच्या हल्ल्यात अमीर रशीद शेख (वय 25 रा. जि. बीड) हा तरूण गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर चार तासांनी तोफखाना पोलिसांनी संशयित तरुणीला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. या तरुणीकडून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने पोलीसही संभ्रमात सापडले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू असल्याने गुन्हा दाखल झाला नव्हता.

नगर-मनमाड महामार्गावरील प्रेमदान चौकातील हॉटेल तोरणामध्ये सकाळी 11 च्या सुमारास अमीर शेख या तरुणावर ऍसिडचा हल्ला झाला. अचानक ऍसिडचा हल्ला झाल्याने हॉटेलसह परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. अमीरला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमीर या मुलाचे नगरमध्ये शिक्षण घेत आहे. आज सकाळी 11 वाजता तो प्रेमदान चौकातील हॉटेल तोरणा येथे आला. हॉटेलमध्ये तो बसला असतांना अचानक तोंडाला रुमाल बांधून डोक्‍यावर टोपी असलेली तरूणी येथे आली. तिने त्यांच्या अंगावर ऍसिड फेकले. त्यात अमीर गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून घडलेल्या प्रकाराची चौकशी केली.

या घटनेचा तपास करतांना एका तरुणीची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनेनंतर चार ते पाच तासांनी एका संशयीत तरूणीला ताब्यात घेतले. ही तरुणी नगर तालुक्‍यातील नारायण डोह येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. या तरूणीने हा हल्ला का केला याचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. या तरुणीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. परंतू ती काही बोलत नसल्याने पोलिसांनी अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, अमीर गंभीर जखमी असल्याने तो देखील काही बोलण्याच्या स्थितीत नाही. सदर घटनास्थळी तरुणीची चप्पल व इतर वस्तू आढळून आल्याने पोलिसांचा तिच्यावर व तिच्या इतर जोडीदाराबाबत संशय वाढला असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे. प्रेमसंबंधातून हा प्रकार झाला असल्याची शंका पोलिसांकडून व्यक्‍त होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.