एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला

नागपूर : देशभरात महिलांवरील अत्याचार काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. अ‍ॅसिड हल्ला, बलात्कार यासारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूर शहरातून समोर आला आहे. एका अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे. पोलिसांनी या हल्यातील दोन आरोपींना अटक केली असून, एकतर्फी प्रेमातून हल्ला केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. मुख्य आरोपी खामेंद्र जगणीत (24) आणि त्याचा मित्र राहुल न्हनेद (24) हे दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी पीडित तरुणी घरी आली होती. सुट्टी संपल्यावर पुन्हा कॉलेजला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असता यावेळी आरोपींनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. अंगावर अ‍ॅसिड फेकल्याने पीडित तरुणी जीवाचा आकांत करत बस स्थानकावर आरडाओरड करु लागली.

त्यानंतर पोलिसांना पीडितेला तातडीने गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपुरला हलवण्यात आले आहे. काही दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ती तरुणीचा पाठलाग करत होते. मात्र यावर अद्याप कोणतेही अधिकृत विधान तरुणीने केलेले नाही. परंतु ही गोष्ट पीडितेच्या नातेवाईकांना पोलिसांनी सांगितली आहे. या हल्लानंतर ग्रामीण भागापर्यंत अ‍ॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अ‍ॅसिड कुठून आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.