कराड दक्षिणमध्ये सर्वाधिक 19 उमेदवार; जावळी मतदारसंघातून 9 अर्ज, चुरस वाढली
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल 108 उमेदवार रिंगणात उतरल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 8 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सातारा-जावळी, फलटण आणि पाटण हे मतदारसंघ वगळता कोरेगाव, माण, वाई, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण या मतदारसंघांमध्ये बंडखोरी उफाळली आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती रंगण्याची शक्यता आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीने दीपक पवार तर वंचित आघाडी आघाडीकडून अशोकराव दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे आ. मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे मदन भोसले अशी पारंपरिक टक्कर होणार असून पुरुषोत्तम जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचिततर्फे रामदास महानवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी 15 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
माण-खटाव मतदारसंघात भाजपच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधात शिवसेनेने शेखर गोरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. शरद पवारांच्या सूचनेनुसार निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वपक्षीय “आमचं ठरलंय’ आघाडीतर्फे अनिल देसाई यांनी अर्ज दाखल केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माजी सभापती संदीप मांडवे तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. प्रमोद गावडे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 19 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
कोरेगावातून राष्ट्रवादीने आ. शशिकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेने महेश शिंदे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेच्या रणजितसिंह भोसले यांनी बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितने बाळासाहेब चव्हाण यांना उमेदवारी दिली असून या ठिकाणी एकूण 12 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. कऱ्हाड दक्षिणमधून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला असून वंचितने बाळकृष्ण देसाई यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 22 उमेदवारी अर्ज दाखल झाल. त्यात 19 वैध ठरले.
कऱ्हाड उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीने आ. बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांच्याविरोधात शिवसेनेने धैर्यशील कदम यांना उतरवले आहे. भाजपचे मनोज घोरपडे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वंचितने मराठा समाजातील सुभाषराव पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात 11 वैध ठरले.
फलटणमधून राष्ट्रवादीने आ. दीपक चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून महायुतीने दिगंबर आगवणे यांना उमेदवारी दिली आहे. वंचितचे अरविंद आढाव हेदेखील रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीने सत्यजित पाटणकर यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. वंचितने अशोक देवकांत यांना उमेदवारी दिली आहे. पाटणमधून 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ते सर्व वैध ठरले. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज छाननी शनिवारी झाली असून सोमवार, दि. 7 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.
लोकसभेसाठी 8 अर्ज वैध
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले (भाजप), श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), चंद्रकांत खंडाईत (वंचित बहुजन आघाडी), अलंकृता अभिजित आवाडे- बिचुकले, दीपक उर्फ श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी, पुरुषोत्तम जाधव, शिवाजी जाधव, शिवाजी भोसले (सर्व अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत.