खर्डा येथील खुनातील आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
तरुणाला केली होती जबर मारहाण; उपचारा दरम्यान मृत्यू
नगर (प्रतिनिधी) –उसणे दिलेले पैसे मागितल्याचा राग आल्याने खर्डा (ता.जामखेड) येथील बाळू बजरंग पवार याला डोक्‍यात दगडाने व लाथाबुक्काने मारहाण करण्यात आली होती. यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्हातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

रोहित ऊर्फ बबल्या बाबासाहेब गोलेकर (वय- 21 रा.खर्डा ता.जामखेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वेणुबाई बाजीराव काळे (वय- 50 रा.कोष्टी गल्ली, खर्डा ता.जामखेड) या आरोपी गोलेकर याच्या घरी उसणे दिलेली पैसे मागण्यासाठी गेल्या होत्या. याचा गोलेकर याला राग आल्याने यावेळी वेणूबाई काळे यांच्या सोबत असलेल्या बाळू पवार याला गोलेकर याने दगडाने व लाथाबुक्‍यांने मारहाण केली होती. यात बाळू याचा उपचारादरम्यान मत्यू झाला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात वेणुबाई काळे यांनी फिर्याद दिली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांना तपासाबाबत सुचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी गोलेकर हा चिखली(ता.हवेली जि.पुणे)येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, संतोष लोंढे, संदीप पवार, रविकिरण सोनटक्के, प्रकाश वाघ, मच्छिंद्र बर्डे, राहुल सोळुंके, रणजित जाधव, संभाजी कोतकर यांनी चिखली येथे सापळा लावून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.