पुणे : वीज मीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसुलाचे नुकसान सहन केले जाणार नाही. रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सी तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा संचालक संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत दिला.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 110 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची पुणे येथील “प्रकाश भवना’मध्ये बैठक झाली. यात एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.
ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलिंगचा मुख्य आधार आहे. त्यात शंभर टक्के अचूकता पाहिजेच. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत, त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल.