लवकरच स्वीत्झर्लंड सरकार घेणार ताबा
नवी दिल्ली/ झुरिच- स्वीस बॅंकेतील भारतीयांशी जोडलेल्या डझनभर निष्क्रीय खात्यांकरिता कोणतेही दावेदार पुढे आले नाहीत. या खात्यांमधील रक्कम बेवारस अवस्थेमध्ये पडून राहिल्यामुळे ही खाती लवकरच स्वीत्झर्लंड सरकार ताब्यात घेण्याचा धोका निर्माण झाला आहे.
स्वीस सरकारने 2015 मध्ये निष्क्रीय खात्यांचे तपशील सार्वजनिक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या खात्यांच्या मालकांनी त्यांच्या खात्यांशी संबंधित आवश्यक ते पुरावे जमा करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या निष्क्रीय खात्यांमध्ये 10 खाती ही भारतीयांशी संबंधित आहेत. यामध्ये काही खाती भारतीय रहिवासी आणि ब्रिटीश राजवटीतपासूनच्या काही नागरिकांशी जोडलेली समाविष्ट आहेत.
मात्र स्वीस बॅंकेकडील नोंदीनुसार भारतीयांशी संबंधित यापैकी एकाही खात्यावर कोणाही भारतीय नागरिकाने गेल्या 6 वर्षांपासून दावा केलेला नाही. यापैकी काही खात्यांवर दावा सांगण्याचा कालावधी पुढच्या महिन्यात समाप्त होणार आहे. तर अन्य काही खात्यांवर दावा सांगण्याचा कालावधी 2020 च्या अखेरीस संपणार आहे.
योगायोगाने, त्यानंतर पाकिस्तानच्या रहिवाश्यांशी संबंधित असलेल्या काही खात्यांवर तसेच स्वित्झर्लंडसह इतर देशांमधील रहिवाश्यांशी संबंधित अनेक इतर खात्यांवरही दावा करण्यात आला आहे. डिसेंबर 2015 मध्ये जेव्हा प्रथम या खात्यांचे तपशील सार्वजनिक करण्यात आले तेव्हा यादीमध्ये जवळजवळ 2,600 निष्क्रीय खाती होती. 1955 पासून या खात्यांवर मिळून 45 दशलक्ष स्वीस फ्रॅंक (300 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम) पडून होते. याशिवाय दावा न केलेले 80 सेफ्टी डिपॉजिट बॉक्सही या यादीमध्ये होते. स्वीस बॅंकिंग कायद्यानुसार “निष्क्रीय’ झाल्यानंतर या यादीमध्ये दरवर्षी नवीन खात्यांची भर पडत आहे. आता या यादीमध्ये 3,500 निष्क्रीय खाती झाली आहेत.
स्वीस बॅंकेतल्या खात्यांमध्ये काळा पैसा साठवला असल्याचा भारताचा संशय आहे. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीयांनीही त्यांची माया स्वीस खात्यांवर जमा केल्याचे मानले जात आहे. जगभरातील दबावामुळे स्वित्झर्लंडने बॅंकिंग यंत्रणेची तपासणी केली आणि त्याचा तपशील खुला करण्याची प्रक्रिया सुरू केली. यातील भारतीयांच्या खात्यांचा तपशील नुकताच खुला केला गेला. त्यानंतर पुढील माहिती सप्टेंबर 2020 मध्ये खुली केली जाणार आहे. दरम्यान, स्विस बॅंकर्स असोसिएशनच्या सहकार्याने स्विस बॅंकिंग लोकपाल निष्क्रिय खात्यांवरील दावे तपासत आहेत.