दक्षिणाचार परंपरेनुसार होतेय कुलदेवतेची उपासना

भारतभर महाशक्तीची उपासना मोठ्या उत्साहाने केली जाते. भारतामध्ये उपासकांचे प्रामुख्याने 1) वैष्णवागम, 2) शैवागम, 3)शाक्तागम असे तीन प्रवाह तथा आगम आहेत. त्यानुसार प्रत्येक उपासकांची उपासना पद्धती व वेशभूषा वेगवेगळी आहे. त्यांची उपासना साधने देखील वेगवेगळी आहेत. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्रोत्सव म्हणजे दक्षिणाचार परंपरेनुसार कुलदेवतेची उपासना करण्याची पद्धती आहे.

विष्णू हे उपास्य मानुन, गळ्यात तुळशीमाळ परिधान करणारे, कपाळावर उभा गंध लावणारे ते वैष्णव. गळ्यात रुद्राक्षाची माळा, कपाळावर आडवा गंध आणि शिवाची उपासना करणारे शैव. गळ्यात कवड्याची माळ, कपाळावर कुंकू लावून देवीची, शक्तीची उपासना करणारे शाक्त. असे तीन प्रवाह आहेत.

शाक्त परंपरेमध्ये दक्षिणाचार व वामाचार असे दोन भेद आहेत. पैकी दक्षिणाचार उपासना ही वेदानुमोदित आहे. मात्र वामाचार हे निंद्य कृत्य करणारे व भ्रष्ट होत. नवरात्रोत्सव म्हणजे दक्षिणाचार परंपरेनुसार कुलदेवता स्वरूपात देवीची उपासना करणे होय. पूजा, वेदमंत्र, सप्तशतीचे पाठ, गोंधळ, जागर, भजन, जप, व्रतानुष्ठान आदी विविधांगाने हा महोत्सव विजयादशमी पर्यंत होतो. ऐहिक सौख्याकरिता ही उपासना प्रचलित आहे. देव, दानव, यक्ष, एवढेच काय असूरही तिची उपासना करतात. 

भारतामध्ये अनेक ठिकाणी वैष्णव, शैव आणि शाक्त यांची परस्पर विन्मुखता दिसून येते. तथापि महाराष्ट्रातील ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कृत वारकरी पंथ समन्वय विचार व समन्वय आचारांचा पुरस्कर्ता आहे. वारकरी परंपरेत जगदंबेला आपले उपास्य पांडुरंगाहून भिन्न मानले जात नाही. “पांडुरंगे येई वो। गोंधळा येई वो।।’ असे विठ्ठलालाच देवीस्वरूपात संत मानतात.

कृष्णाई, कान्हाई, विठाई, किठाई असे संबोधत श्रीविठ्ठलाला तिच्या स्वरूपात गोंधळाला बोलावून अद्वैतानुभूती घेणे हे नवरात्रोत्सवाचे प्रयोजन वारकरी संत मानतात. “आईचा जोगवा जोगवा मागेन’ म्हणत जोगवा ज्या परडीत स्वीकारायचा ती “पूर्ण बोधाची परडी’ घेऊन पंढरीच्या महाद्वारात नवस फेडणारे संत शिव-शक्ती समावेशन मानतात.

म्हणोनि भूतेशु भवानी। वंदिली न करोनि सिनानी। (अमृतानुभव) अशी असंख्य संतवचने प्रसिद्धच आहेत. (क्रमशः)

– हभप भागवत महाराज साळुंके

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.