कार्वे पुलावर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे घडताहेत अपघात

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; रस्ता दुरूस्तीची वाहनधारकांची मागणी

वडगाव हवेली – कार्वे (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील पूल खड्डेमय झाला आहे. खड्ड्यांमुळे येथे अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे लहानमोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे. पुलावरील रस्त्याची भयावह अवस्था निर्माण झाली असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हाच प्रश्‍न वाहनधारकांना पडत आहे.

कराड- तासगाव राज्यमार्गावर कार्वे येथे कृष्णा नदीवरती चाळीस मीटर लांबीच्या आठ गाळयांचा पूल आहे. या पुलावरून कराड, तासगाव, कवठे महांकाळ यासह अनेक गावांची वाहतूक या पुलावरून होत असते. दुचाकी, चारचाकी, एस.टी, प्रवासी वाहतूक, मालवाहतूक करणारे ट्रक, अवजड वाहतूक तसेच कृष्णा, सह्याद्रि, जयवंत शुगर, सोनहीरा, रयत आदी कारखान्यांची ऊस वाहतूक याच पुलावरून केली जाते आहे. पुलावर वाहनांची सतत वर्दळ असल्याने या पुलावरती जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्डयांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

समोरुन भरधाव येणाऱ्या चारचाकी वाहनांना बाजू देताना व दुचाकीस्वारांना खड्‌डे चुकविताना कसरत करावी लागते आहे. दुचाकीस्वारांचा खड्‌डे व समोरून येणारे वाहन चुकविण्याच्या नादात पुलाच्या संरक्षक कठडयास धडकून अनेक अपघात झाले आहेत. या अपघातात कोणाच्या हातापायास दुखापत झाली आहे तर काहींना मुका मार सहन करावा लागला आहे. तर काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.

पुलावर पडलेल्या खड्ड्यांची संख्या इतकी आहे की दुचाकी अथवा चार चाकी चालवताना एक चाक पुढच्या खड्ड्यात तर मागचे दुसऱ्या खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे भरधाव वाहनांवरील ताबा सुटून दुचाकीस्वारांना धडक बसल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पुलावरून शेरेस्टेशन येथून अनेक डंपरमधून खडी, मुरुम, माती, आदीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते असते. चौपदरीकरणा दरम्यान ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने दोन वर्षात रस्त्याचे वाटोळे झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.