ठेकेदार व आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरीकांची मागणी
सविंदणे : मलठण -शिरूर रस्त्यावरील ओढयावरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे प्रलंबित आहे. सध्या ओढयाला पाणी असल्यामुळे व रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे . अशा आशयाची बातमी दैनिक प्रभात मध्ये प्रसिद्ध होऊनही ठेकेदार आधिकाऱ्यांना जाग आली नाही. त्यामुळे या पुलावरुन प्रवास करणारी स्वीप्ट कार घसरून पाण्यात पडली. प्रसगांवधान दाखवून इतर लोकांनी मदत केल्यामुळे गाडीतील युवकांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवीतहाणी टळली.
सदर पुलाच्या कामाच्या ठिकाणी खोदकाम करून ठेवल्यामुळे गाडया घसरून वारंवार अपघात होत आहे. . घटनास्थळी यापुर्वी अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे त्वरीत रखडलेल्या रस्त्याच्या पुलाचे काम ठेकेदाराने पूर्ण करण्याची मागणी मलठणचे सरपंच प्रकाश गायकवाड ,किरण देशमुख , दत्ता गडदरे यांनी केली आहे.
शिरूर-मलठण मार्गे खेड, मंचर, नारायणगाव, भिमाशंकर, नाशिक येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर कायम वर्दळ असते त्यामुळे या रस्त्यावरील पुलाचे रखडलेले काम लवकर व्हावे .अन्यथा बांधकाम विभागाच्या आधिकाऱ्यांना व ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने काळे फासले जाईल अशा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख गणेश जामदार यांनी दिला आहे.