अकोला : अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालयातील अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात उपचार सुरू असलेल्या करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली. या करोनाबाधित रुग्णाने शनिवारी पहाटे गळ्यावर ब्लेड मारून घेतल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
मोहम्मद जहरुल इस्लाम असे आत्महत्या करणा-या करोनाबाधित रुग्णाचे नाव आहे. अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात करोना संसर्गित रुग्ण म्हणून दि. 7 एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण आज (दि.11) पहाटे 5 वाजताच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली. मोहम्मद जहरुल इस्लाम हा मूळचा सालपडा जि. नागाव, आसाम येथील रहिवासी आहे. काल दि.10 रोजी आलेल्या अहवालात हा रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.