मायणी – मल्हारपेठ – पंढरपूर महामार्गावर मायणी येथील मठाजवळ अपघात होऊन चार दिवस उलटले नाहीत तोवर काल बुधवार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मायणी पक्षी आश्रयस्थानाच्या नूतन बगिच्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर झालेल्या दहाचाकी ट्रक व मारुती ब्रिझा कार यांच्या भीषण अपघातात विखळे (ता. खटाव) येथील राजेंद्र जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
या भागात अपघाताची मालिका सतत सुरू असल्याने मायणी अभयारण्य ते भारतमाता विद्यालयापर्यंत जास्तीत जास्त गतिरोधक होण्याची गरज आहे. याबाबत घटनास्थळावरून व मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, विखळे गावाचे रहिवासी राजेंद्र जाधव मायणी येथून आपल्या गावाकडे या महामार्गाने रात्री 11 च्या सुमारास जात असताना मायणी पक्षी आश्रयस्थानानजीकच्या वळण रस्त्यावर आले असता समोरून आलेल्या दहाचाकी ट्रकसोबत त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.
यात राजेंद्र जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने ट्रक धडकेनंतर रस्त्याखाली गेला तर धडक बसलेल्या कारचा चक्काचूर झाला. रात्रीची वेळ असल्याने इतर वाहने ते भीषण दृश्य पाहून थांबणे टाळत होते. यावेळी काही प्रवाशांनी धाडसाने पुढे येत मायणी पोलीस दुरक्षेत्र व विखळे गावात या घटनेची माहिती कळवली.
लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मृत राजेंद्र जाधव दबलेल्या कारमध्ये अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करावा लागला. राजेंद्र जाधव यांच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाना कारंडे व सहकारी तपास करीत आहेत.