चालकाला डुलकी लागल्याने मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई : राज्यात अपघाताचे सत्र सुरू झाले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण अपघात झाले असून अनेकांचा मृत्यू आणि बरेच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले. जखमींना पवना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गाडी चालवताना चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. अपघातात तवेरा गाडी महामार्गावर पलटी झाली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाच्या हद्दीमध्ये शुक्रवारी सकाळा पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. पवना रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, संदीप कासेकर, संतोष कासेकर, मंगेश कासेकर, जानकीबाई कासेकर, सुप्रिया मिसाळ, जागृती कासेकर, रचना बांदूरकर अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये दहा प्रवासी होती, अशी माहिती मिळाली आहे. अपघातानंतर काहीवेळा या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पण महामार्ग पोलिसांनी त्वरित कारवाई करून अपघातग्रस्त गाडी हटविली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.