पिंपरी – एका भरधाव वेगातील ट्रकने झोपडीत घुसून गाढ झोपेत असलेल्या अकरा वर्षांच्या मुलाला आणि त्याच्या आईला चिरडले. या अपघातात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, मुलाची आई गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.
गोपी बनारसी सोळंकी (वय 11) असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याची आई बेबी बनारसी सोळंकी (वय-36) या गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालक इरफान महम्मद जमादार याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनारसी हे मूळचे हरियाणा येथील रहिवासी असून ते मागील काही दिवसांपासून पुणे शहरात राहत आहेत. मोशी परिसरातील रस्त्याच्या बाजूला बनारसी हे हेल्मेट विकण्याचे काम करतात. त्याच ठिकाणी झोपडी उभारुन ते वास्तव्यास होते.
बनारसी यांचे कुटुंब रात्री झोपडीमध्ये झोपलेले असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मोशी जकात नाका येथून पुण्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून विरुध्द दिशेच्या रस्त्यावर आला. भरधाव वेगातील ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या सोळंकी यांच्या झोपडीत घुसला. गाढ झोपेत असलेल्या गोपी सोळंकी याच्या अंगावर ट्रक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याची आई बेबी जखमी झाल्या आहेत.