रायगड – अलिबागमध्येही झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील जेएसडब्लू येथून रोहा बाजूकडे येणाऱ्या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे वाहन चालवत आठ जणांना उडवले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले असून, एक महिला अत्यवस्थ आहे, तर चार जण किरकोळ जखमी आहेत.
पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्यासाठी प्रयत्न केला असता. त्याने अनेक वाहने आणि अडथळे उडवून लावत भरधाव वेगाने ट्रक नेत न्हावे फाट्यानजीक एका जोडप्याला आणि त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा शिक्षक लक्ष्मण ढेबे आणि त्यांचा मुलगा जागीच ठार झाला. तसेच त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले.
सदर अपघातात ट्रकने दिलेल्या धडकेत संबंधित शिक्षकांच्या वाहनाचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मीटर फरफटत नेली. त्यानंतर सदर चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडेला जोरदार धडक दिल्याने सदर व्यक्तीदेखील जागीच मृत झाली.
भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगावनजीक स्थानिक तरुणांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. सदर घटनेचे गांर्भीय ओळखत स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी आणि रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली.