श्रीगोंदा – नगर- दौंड महामार्गावर लोणी व्यंकनाथ शिवारात दुचाकी व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. हा अपघात आज (दि.9) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला. हे चारही युवक लोणी व्यंकनाथ येथील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील प्रतीक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे आणि राहुल बाजीराव बरकडे हे चार युवक आज सकाळी अकरा वाजता दुचाकीवरून लोणी व्यंकनाथकडून नगरकडे चालले होते. त्याच दिशेने चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना नगरकडून येणार्या एका ट्रकने या दुचाकीस्वारांना समोरून जोराची धडक दिली.
धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ही धडक इतकी जोराची होती की, यातील तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी युवकाला उपचारासाठी रुग्णालया नेत असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.
यावेळी जमलेल्या ग्रामस्थांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले. घटनेनंतर काहीच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांनी ट्रकचालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेले चारही युवक तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी असून, या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.