संबलपूर – ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात रविवारी पहाटे एका डंपरने कारला धडक दिली. या अपघातात भाजपच्या दोन नेत्यांचा मृत्यू झाला. देवेंद्र नायक आणि मुरलीधर चुरिया अशी मृतांची नावे आहेत. नायक हे भाजपच्या गोशाळा मंडळाचे अध्यक्ष होते, तर चुरिया हे माजी सरपंच होते. हे दोन्ही नेते भाजपचे ज्येष्ठ नेते नूरी नायक यांच्या जवळचे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्ला पोलीस स्टेशन हद्दीतील एनएच 53 वर पहाटे 1.30 वाजता ही घटना घडली. कारमध्ये चालकासह सहा जण होते. ते भुवनेश्वरहून कर्दोला येथील आपल्या घरी परतत होते. अपघातानंतर सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले, तर इतरांवर उपचार सुरू आहेत.
या घटनेत जखमी झालेले सुरेश चंदा यांनी आरोप केला की, डंपरने आमच्या कारला मागून दोनदा धडक दिली. आमच्या गाडीला कोणीतरी जाणूनबुजून धडक देत असल्याचा आम्हाला संशय आला. त्यामुळे चालकाने महामार्गावरून कांथापली चौकाच्या दिशेने कार वळवली.
मात्र पाठीमागून आलेल्या डंपरने पुन्हा कारला धडक दिली. त्यामुळे कार उलटली. कारला दोनदा धडक बसली तेव्हा ते शुद्धीवर होते. मात्र डंपरने त्यांना तिसऱ्यांदा धडक दिल्याने ते बेशुद्ध झाले. चंदा म्हणाले की, मला खात्री आहे की हे जाणूनबुजून केले गेले.
जखमींची भेट घेतल्यानंतर माजी आमदार नूरी नायक यांनी हा अपघात नसून जाणीवपूर्वक टक्कर झाल्याचे सांगितले. नेत्यांच्या गाडीला कोणीतरी जाणीवपूर्वक तीन वेळा धडक दिल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, सबलपूरचे पोलिसांनी सांगितले की, आम्ही डंपर जप्त केला असून त्याच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी करू.