लातूर :- लातूर जिल्ह्यातील बोरगावकाळे येथे एसटीला झालेल्या अपघातात 53 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातातील 14 जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
लातूर-पुणे-वल्लभनगर एसटी आगारातून ही बस पुण्याच्या दिशेने निघाली. मुरूडजवळील बोरगाव काळे येथील पुलावर बस आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
एसटी बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला. त्यामुळे चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरून खाली उतरत मातीच्या ढिगाऱ्यावर जाऊन आदळली. यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले.
जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने मुरूड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर 14 प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या जखमींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांचाही समावेश आहे.