सामनेर : पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील माॅर्निंग वाॅकला गेलेल्या दोन महिलांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. हा अपघात आज (गुरूवारी) सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेश द्वाराजवळ घडला. मनीषा साहेबराव पाटील (वय-50), अनिता शहादु पाटील (वय-48) अशी अपघातात मृत्यू पावलेल्या महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा पाटील व अनिता पाटील या दोघी महिला नेहमीप्रमाणे माॅर्निंग वाॅकसाठी निघाल्या होत्या. यावेळी माॅर्निंग वाॅकवरून परतत असताना त्यांना कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात एवढा भीषण होता की, कारच्या धडकेनंतर एक महिला बाजुला फेकली गेली तर दुसऱ्या महिलेला कारने तब्बल 50मीटर फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघी महिलांना पाचोरा ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.