महापालिकेच्या योजनेसाठी 10 महिन्यांत 38 अर्ज
पुणे – नियमित मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांसाठी पालिकेकडून सुरू केलेल्या पंडित दिनदयाळ अपघात विमा योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षात 38 अर्ज आले आहेत. त्यातील 6 दाव्यांमध्ये तातडीने प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्यात आली असून उर्वरित दावे मान्यतेच्या प्रक्रियेत आहेत. दरम्यान, ही मदत देण्यात आलेल्या दाव्यांमध्ये आंबिल ओढ्याला आलेल्या पुरातील मृतांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 2018-19 च्या अंदाजपत्रकात ही अपघात विमा योजना प्रस्तावित केली होती. त्यात नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकाचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला 5 लाखांची मदत देण्यात येत होती. त्यानंतर 2019-20चे अंदाजपत्रक सादर करताना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या योजनेत बदल केले. त्यात केवळ मिळकतधारकाचा मृत्यूसह कुटुंबातील व्यक्तींनाही 1 लाखांपर्यंतचा उपचाराचा खर्च तसेच 5 लाखांचा विमा लागू केला. त्यानंतर यावर्षी योजनेत गेल्या दहा महिन्यांत 36 दावे दाखल झाले. त्यात 28 आंबिल ओढ्यातील पूरबाधितांचा समावेश आहे.
मात्र, त्यातील केवळ 8 जण पुणे शहरातील रहिवासी असून त्यातील दोन दाव्यांमध्ये 5 लाखांची मदत देण्यात आली असून उर्वरित 6 दावे मान्यतेच्या प्रतिक्षेत आहेत. तर 22 प्रकरणांमध्ये दाव्यांची रक्कम देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. तर 10 दाव्यांमुळे कुटुंबामधील व्यक्तींना प्रत्येकी 1 लाखांची उपचाराची मदत महापालिकेकडून देण्यात आली असल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी सांगितले.