वाघळवाडी – सोमेश्वर साखर कारखान्याने 2012 साली सुरू केलेल्या सभासद अपघात विमा योजनेमुळे सर्वसामान्य शेतकरी सभासदांना फायदा होत आहे. वाणेवाडी गावचे प्रकाश मांढरे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या पत्नी श्रीमती कमल प्रकाश मांढरे यांना सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी संचालक किशोर भोसले, वाणेवाडीचे उपसरपंच संजय जगताप, फायनान्स मॅनेजर कदम आदी उपस्थित होते.
सभासदांना अतिशय गरजेचे असलेले विमा कवच पुरुषोत्तम जगताप यांनी दूरदृष्टी ठेवून सुरू केल्यामुळे खूप मोठे सहाय्य होत आहे. अपघाती निधन झाल्यावर जरी गेलेला माणूस परत येऊ शकत नाही तरी कुटुंबावर झालेल्या आघातावर फुंकर मारण्यासाठी मदत होत आहे.
सभासदांसाठी समूह आणि वैयक्तिक याप्रकारे युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनीच्या वतीने वीमा योजना सुरु करण्यात आली असून आतापर्यंत 50 सभासदांना याचा लाभ मिळाला आहे. 27 हजार सभासदांना ही योजना सुरु करण्यात आहे. काही विपरीत घटना घडल्यास सभासदांच्या कुटूंबातील वारसाला सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर याचा लाभ मिळणार आहे. कारखान्याने सुरु केलेल्या या योजनेचा सर्वसामान्य सभासदांना भविष्यातही आर्थिक मदत मिळणार आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सभासद आणि कामगार यांच्या हितासाठी दुरदृष्टी ठेवून घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.