उंब्रज, (प्रतिनिधी) – हिंगनोळे, ता. कराड गावच्या हद्दीत एसटी बसचा स्टेरींग रॉड तुटल्याने बस नाल्यात आदळून अपघात झाला. बुधवार, दि. 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या अपघातात 13 विद्यार्थीनी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे हिंगनोळे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, चोरजवाडी ते कराड बसमधून सकाळच्या वेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी उंब्रज व कराड येथे शिक्षणानिमित्त ये-जा करतात. सकाळची वेळ असल्याने उंब्रज, कराड येथे कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एसटी फुल्ल भरली होती.
हिंगनोळे गावच्या हद्दीत एसटी आल्यानंतर झरे वस्तीसमोर चोरे ते उंब्रज येणाऱ्या मार्गावर एसटीचा स्टेरींग रॉड अचानक तुटला. मात्र, प्रसंगावधान राखून चालकाने गाडी नाल्यात ओढली. त्यामुळे बस पलटी झाली नाही व सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
एसटी आदळल्याने विद्यार्थी एकमेकांना धडकून पडल्याने अनेकांना मार लागला आहे. अपघात सुमारे 13 विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी उंब्रज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कराड येथे कृष्णा रुग्णालय काही विद्यार्थीनीना दाखल करण्यात आले आहे.
अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. स्टेरींगचा रॉड तुटल्याचे लक्षात येताच चालकाने क्लिनरच्या बाजूला नाल्यात एसटी बस दाबली. पावसाने निर्माण झालेल्या चिखलात बस अडकून पडल्याने थांबली व मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी विद्यार्थिनी घाबरून गेल्या होत्या.