Accident Compensation – संसार सुरळीत सुरू असताना अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. शिक्षण घेणाऱ्या दोन्ही मुलांना शुल्क भरण्यासह दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कसरत करावी लागली. त्यात वय झालेल्या आजोबा-आजींची जबाबदारी. अशा परिस्थितीत मुलांना आशेचा किरण मिळाला. दीड वर्षांपासून न्यायालयात दाखल असलेला मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचा दावा निकाली निघाला. दोघांच्या मृत्यूची मिळून ९५ लाख रुपये भरपाई मिळाली. थोरल्या मुलाने नुकतेच १८ वर्ष पूर्ण केले आहे. स्वत:सह भावाच्या शिक्षण पूर्ण करण्यासह आजी-आजोबांना सांभाळण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. या दाव्यात तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील ॲड. जी. पी. शिंदे, ॲड. सतीश घरत आणि ॲड. मकरंद शिंदे, विमा कंपनीचे वकील पंकज मेहता व अधिकारी श्रद्धा पूर्णपात्रे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. माधव (वय ४०) आणि माधवी (वय ३६) (नावे बदलली आहेत) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी दोघे दुचाकीवरून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून चालले होते. त्यावेळी वडगाव मावळच्या हद्दीत पाठीमागून आलेल्या जीप गाडीने दुचाकीला धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. लोक अदालत (संग्रहित छायाचित्र) या अपघातात दाम्पत्याच जीव गेलाच. मात्र, कुटुंबियांचीही परवड सुरू झाली. शिक्षण घेणारी दोन्ही मुले आणि ६५ वर्षाचे आजोबा व ६२ वर्षांंची आजी. कुटुंबातील जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न झाला. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना झगडावे लागत होते. या परिस्थितीत कुटुंबियांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे ॲड. जी. पी. शिंदे, ॲड. सतीश घरत आणि ॲड. मकरंद शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला. जीपचा मालक आणि विमा कंपनी असलेल्या लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात डिसेंबर २०२४ मध्ये हा दावा दाखल केला होता. माधव सरकारी नोकरीला होते. त्यांना दरमहा ५० हजार रुपये पगार होता. तर माधवी गृहिणी होती. मृत्यू समयीचे वय, दोघांवर असलेल्या अवलंबत्वाचा विचार करून अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली. शनिवारी (दि. ९) झालेल्या लोकअदालतमध्ये कुटुंबियांची परिस्थिती पाहून संवेदनशील दाव्यात तडजोड करण्यास अर्जदार व विमा कंपनीने सहमती दर्शवली. “या दाव्यात झालेल्या तडजोडीमुळे कुटुंबियांना जीवन जगणे सुखकर बनणार आहे. कुटुबियांचा वेळ, पैसा वाचणार आहे. योग्य वेळी तडजोड झाल्याने मिळणाऱ्या रकमेतून दोन्ही मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कुटुंबियांना न्याय मिळवून दिल्याने आनंद वाटत आहे.” – ॲड. जी. पी. शिंदे, अर्जदारांचे वकील