लखनौ – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील रामापूरमध्ये भीषण अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीवरून जाणाऱ्या काका-पुतण्याला चिरडल्यामुळे हा अपघात घडला आहे. ही स्कॉर्पियो लखीमपूर सदर विधानसभा मतदार संघातील भाजपआमदार योगेश वर्मा यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. काके-पुतणे एका लग्नाला जात असताना हा अपघात झाला.
या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार, काका-पुतण्या असलेले दोन तरुण दुचाकीवरून एका लग्नात जात होते. ते रामपूरजवळ पोहोचले असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येत असलेल्या स्कॉर्पियोने धडक दिली. त्यामुळे हे दोघेही खाली पडले. या स्कॉर्पियोवर आमदार असे लिहिलेले होते. ही गाडी लखीमपूर सदर येथील आमदार योगेश वर्मा यांची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्कॉर्पियो योगेश वर्मा यांच्या पत्नीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. दरम्यान, जेव्हा ही दुर्घटना झाली तेव्हा आमदार योगेश वर्मा हे त्या गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.
रवी वय, 22 असे पुतण्याचे नाव असून सुमित वय, 28 काकाचे नाव आहे. या अपघाताचे नेमकं कारण समोर येऊ शकले नाही. पोलीसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पुढिल तपास पोलीस करत आहेत.