खोपोली – पेण-खोपोली मार्गावर गागोदे फाटा येथे एसटी आणि टॅंकर यांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी आहेत. रघुनाथ म्हात्रे व दिनेश खेडेकर अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर पेणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हा अपघात रविवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. एसटी बस खोपोलीहुन पेणकडे निघाली असताना समोरून येणारा गॅसवाहक टॅंकर अनियंत्रित झाल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. त्यानंतर एसटीचा उजव्या बाजूचा पत्रा कापला गेला आणि एसटी रस्त्याच्या बाजूला कलंडली.
यात दोन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य केले.