फूटपाथवर घाईघाईने “पेव्हर ब्लॉक’चे काम पूर्ण

साताऱ्याची तऱ्हा; मोती चौकात विनाटेंडर झालेले काम ठरणार अडचणीचे

सातारा – मोती चौक ते राजवाडा या दरम्यान असणाऱ्या फूटपाथला विनाटेंडर पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी केलेल्या घाईमुळे शहरात वेगळीच चर्चा आहे. शिवजयंतीची तयारी या गोंडस नावाखाली गरज नसताना खर्च दाखवायचा म्हणून पेव्हर ब्लॉक बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, घाईच्या नादात पेव्हर ब्लॉक व्यवस्थित न बसल्याने पादचाऱ्यांची आणि विक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे.

निविदा प्रक्रिया न राबविता कामं रेटायची आणि मर्जीतील ठेकेदाराला “रेड कारपेट’ घालायचा ही अवैध पध्दतीने बोकाळलेली सरकारी छापाची बाबूगिरी आवरण्याची गरज यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे. बिले काढायची जितकी घाई ठेकेदारांना नसते, तितकी घाई अधिकारी व पदाधिकाऱ्यांना झालेली असते. मोती चौक ते राजवाडा या दरम्यान नवीन पेव्हर ब्लॉक टाकायची चर्चा झाली आणि लगेचच निविदा होण्याच्या आधीच या कामाला बाळसे आले.

मोती चौकातील चंदुकाका स्वीटस येथील दुकानापासून दहा फूटांच्या अंतरावर “पेव्हर ब्लॉक’ खचून फूटपाथला भगदाड पडण्याची भीती होती. एवढेच निमित्त पकडून तातडीने मोती चौक ते राजवाडा या दरम्यानच्या फूटपाथचे पेव्हर बदलण्यात आले. शिवजयंतीची तयारी म्हणून ठेकेदारालाही पालिका प्रशासनाने सूट दिल्याची चर्चा आहे.

मात्र, इथे नियमामध्ये जरा जास्तच मोडतोड झाल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचे काम असेल तर ई निविदा प्रक्रिया राबवावी लागते. मात्र, इथे टेंडर प्रक्रिया बाजूला ठेवून पालिकेतल्याच एका अभियंत्याने एका ठेकेदाराच्या भागीदारीत पेव्हरचा हा कार्यक्रम उरकल्याने सातारा पालिका नियम पाळणार कधी असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

या कामाचे बिलसुध्दा बनवण्याचे काम लेखा विभागात युध्दपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येते. शिवजयंतीसाठी अर्थसंकल्पात सात लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, त्यापेक्षाही जास्त खर्च झाल्याचे समजते. याच निधीतून या कामाचे बिल देण्यात येणार आहे. मात्र, काम वेगात होऊन पेव्हर ब्लॉक बसून झाले होते. या “पेव्हर ब्लॉक’मुळे सोय सातारकरांची झाली की फूटपाथवरील विक्रेत्याची हे मात्र समजायला मार्ग नाही.

सातारकरांसाठी की ठेकेदारांसाठी?
“पेव्हर ब्लॉक’मधील सिमेंट वाळण्याच्या आधीच रस्त्याच्या पलीकडील बाजूचे “पेव्हर’ बदलण्याचा हट्ट धरण्यात आला आहे. मोती चौकात पाच वर्षापूर्वी नगराध्यक्ष निधीतून पेव्हरचे काम करण्यात आले होते. गरज नसताना ठेकेदारांच्या गरजा भागवणारी सातारा पालिका सातारकरांसाठी की ठेकेदारांसाठी, असा प्रश्‍न विचारला जात आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता भाऊसाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती दिली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.