महापौर, संचालकांच्या सूचना : कामांची केली पाहणी
पिंपरी – केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या कामांना वेग देण्यात यावा, अशा सूचना महापौर उषा ढोरे व स्मार्ट सिटी संचालकांनी गुरुवारी केल्या.
स्मार्ट सिटीच्या निगडी येथील आस्तित्व मॉल मधील कंट्रोल अँन्ड कमांड सेंटर, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर येथील एरिया बेस्ड डेव्हलपमेंट (क्षेत्र आधारित विकास) अंतर्गत होत असलेल्या कामांची पाहणी महापौर ढोरे यांच्यासह स्मार्ट सिटी संचालक व अधिकाऱ्यांनी केली. आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त (3) प्रविण तुपे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, जनरल मॅनेजर अशोक भालकर, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता मनोज शेटीया, रविंद्र पवार उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी कंपनी अंतर्गत निगडी येथील कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरमध्ये सीसीटीव्ही, पाणी मीटर, व्ही.एम.डी. डिसप्ले, ट्रॅफिक सिग्नल, पर्यावरण सेन्सर, जलनिसा:रण, घनकचरा व्यवस्थापन या विभागांची संपुर्ण माहिती मिळण्यासाठी स्मार्ट नियंत्रण कार्यपद्धती सुरू होणार आहे. हे काम डिसेंबर-2020 अखेर पूर्ण करुन महापालिकेकडे हस्तांतरित करावे.
तसेच एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर या ठिकाणी स्मार्ट रस्ते, खेळांची मैदाने, स्मार्ट गार्डन, टॉयलेट, पादचारी मार्ग आधुनिक करणे आदी कामांचा अंतर्भाव केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा स्मार्ट सिटी संचालक दरमहा आढावा घेणार आहे. ही सर्व कामे जलद गतीने पूर्ण करावी. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत होणारे प्रकल्प नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करावे, अशा सूचना महापौर ढोरे व संचालकांनी अधिकाऱ्यांना दिल्या.