कराड तालुक्‍यात शाळांच्या निर्जंतुकीकरणाला गती

पालिका व ग्रामपंचायतींवर जबाबदारी; सोमवारपासून शाळा होणार सुरु

कराड   – सोमवार दि. 23 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 ते 12 पर्यंतच्या कराड तालुक्‍यातील शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे शाळांच्या र्निजंतुकीकरणाला गती आली आहे. तालुक्‍यातील सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार शहरातील शाळांच्या र्निजंतुकीकरणाचे काम नगरपालिकांवर सोपवण्यात आले आहे. तर ग्रामीण भागातील शाळांची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व शिक्षण विभागावर आहे. या पार्श्‍वभूमीवर कराड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील शाळांच्या वर्गांसह शाळेचा आवार, शौचालयाचा परिसर सॅनिटाइज करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे.

करोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यातील शासनाने पाहिल्या दिवसापासून मायक्रो प्लॅनिंग केले. देशातील पहिला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर दि. 21 मार्च पासून करण्यात आलेला लॉकडाऊन हा त्या प्लानिंगचाच भाग होता. देशाची लोकसंख्या आणि तुटपुंजी आरोग्य व्यवस्था लक्षात घेता करोना महामारीचा फैलाव रोखण्यासाठी शासनाला कठोर पावले उचलावी लागली. लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांचे हाल झाले. अनेक उद्योगधंदे बंद झाले. तर अनेकांची उपासमार झाली. देशाच्या इतिहासात कधीही न भरून येणारी जीवीत आणि वित्तीयहानी झाली आहे. मात्र, लोकांचे प्राण वाचले पाहिजे, यासाठी आवश्‍यकतेनुसार शासनाने योग्यती पावले उचलली आहेत.

यात महत्वपूर्ण पाऊल म्हणजे जनता कर्फ्यूपासून आजपर्यंत बंद करण्यात आलेल्या शाळा. या महामारीवर गेल्या आठ ते दहा महिन्यात जगाच्या पाठीवर कोणत्याही देशाला रामबाण औषध निर्माण करता आलेले नाही. अनेक देशात संशोधन सुरू आहे. तर अनेक देशांची लसी तयार होऊन लवकर बाजारात उपलब्ध होतील, असे केंद्रीय ओराग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, सध्यात सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क वापरणे याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
दरम्यानच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण पध्दतीवर भर दिला.

गेली आठ महिने ऍन्ड्रॉईड मोबाईल फोन विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले होते. करोनाची लाट कमी झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने दि. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग आणि इयत्ता 9 वी ते 12ची वसतीगृहे, आश्रमशाळा विशेषत: आंतररराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरु करण्यास मान्यता दिली आहे. तसेच या शाळा पूर्णपणे र्निजंतुकीकरण करण्याचे आदेश देत शाळांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कराड तालुक्‍यातील शाळांचे र्निजंतुकीकरणाचे काम युध्द पातळी सुरू झाले आहे. कराड पालिकेच्या आरोग्य विभागाच्या फिनेल पावडर टीमचे कर्मचारी नारायण कांबळे, राम भिसे, मनोज गायकवाड, दिपक काटरे, प्रविण भिसे, अजय वायंदडे, शंकर भोसले यांच्याकडून टिळक, छ.शिवाजी व विठामाता, यशवंत हायस्कूल सॅनिटाइज करण्यात आले आहे.

 

सोमवार दि. 23 रोजी कराड तालुक्‍यातील 9 वी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरू होत आहेत. शहरी भागातील शाळांचे र्निजंतुकीकरण संबंधित नगरपालिकेचा आरोग्य विभाग करत आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळांचे र्निजंतुकीकरण ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, शिक्षण समिती यांनी आरोग्य विभागाच्या सूचनानुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उत्तम दिघे, प्रांताधिकारी कराड

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.