महाबळेश्वर -शहरातील नागरिकांच्या वैद्यकिय तपासणीचा वेग वाढविण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा स्वयंसेविकांची नेमणूक करावी, अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी केली. महाबळेश्वर तालुका आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी पाटील या उपस्थित होत्या.
करोनाबाबत महाबळेश्वर तालुक्याचा आढावा घेण्यासाठी अिा. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाळासाहेब भिलारे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, गटविकास अधिकारी नारायण घोलप उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्याचा आढावा मांडताना तहसीलदार सुषमा चौधरी पाटील म्हणाल्या, आज अखेर तालुक्यातील बाधितांची संख्या 152 झाली असून सध्या 62 रूग्णांवर उपचार सुरू आहेत तर आज अखेर 82 जण करोनामुक्त झाले आहेत. तसेच तालुक्यात आजअखेर पाच जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. 152 रूग्णांमध्ये बेल एअर येथे थेट मुंबई वरून आलेल्या रूग्णांचाही समोवश असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.
तालुका वैद्यकिय अधिकारी म्हणाले, रूग्ण वाहिकांची कमतरता असून रात्री एखादा रूग्ण आला तर त्याचा स्वॅब सकाळी घेण्यात येतो तोपर्यंत रूग्ण दाखल करून घेण्याची सोय महाबळेश्वर तालुक्यात नाही, ती सोय बेलएअर मध्ये झाली तर लोकांना याचा फायदा होईल. गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी ग्रामीण भागातील लोकांना अर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे सांगत रोज वाफ, काढा व हळद दुध घेण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती दिली.
महाबळेश्वर वाई व खंडाळा या तीन तालुक्यासाठी तीन रूग्ण वाहिका मिळाव्यात अशी मागणी पालकमंत्री बाहासाहेब पाटील केल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी दिली. ज्या भागातील लोक वैद्यकिय तपासणीसाठी सहकार्य करीत नाही, त्यांची जनजागृती करावी व सहकार्य करण्यास तयार करावे, तालुक्यातील लोकांच्या तपासणीचा वेग वाढविण्याची आवश्यकता आहे.
बेल एअर मध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध केले पाहिजेत, असे मत आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केले. या बैठकीला डॉ. राजीव शहा, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, ऍड. संजय जंगम, प्रवीण भिलारे, दत्ताजी वाडकर, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, विशाल तोष्णीवाल, तौफिक पटवेकर, इरफान शेख, रोहित ढेबे, संदीप मोरे, सुनिल पार्टे, गणेश ढेबे आदी उपस्थित होते.