वॉशिंग्टन : जगभरातील अनेक देशांमधून सध्या सुरू असलेल्या कोविड-19 विरोधातल्या औषधाच्या शोधासाठी वेग आला आहे. त्यासाठी अनेक देशांमधून मानवी चाचणीही सुरू झाली आहे. हे औषध जितक्या लवकर उपलब्ध होईल, तितके सर्वसामान्य जीवन पुन्हा सुरू होईल, या आशेवर या शोधामध्ये स्वतःलाही सहभागी करून घेण्यासाठी अनेक देशांमधील संशोधक उत्साह दाखवू लागले आहेत. जगभरातील संशोधकांचे किमान 100 गट या संशोधक कार्यामध्ये सक्रिय आहेत. तर त्यापैकी किमान डझनभर गटांनी मानवी चाचण्यांनाही सुरुवात केली आहे. या शोधाच्या कामामध्ये अनेकांचे योगदान लागते आहे. मात्र त्यात अनेक अडथळे आहेत. हे अडथळे फारच कमी जणांना पार करता येऊ शकतील, असे संशोधकांचे मत आहे.
करोना विषाणूवरील औषध शोधण्यासंदर्भात संशोधकांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. केवळ या साथीच्या आपत्तीवर ठोस औषध सापडायला हवे. या करोनाशीच आमची शर्यत आहे. त्यामुळे या शर्यतीत जितके जास्ती जण सहभागी होतील, तितकी आम्हाला त्यांची गरजच आहे, असे ऑक्सफोर्ड विद्यापीठातील संशोधन प्रकल्पाचे प्रमुख असलेले डॉ. ऍन्ड्रू पोलार्ड यांनी सांगितले. अनेक जण प्रयत्नशील आहेत. पण त्यापैकी कोणाच्या प्रयत्नांना यश येईल हे सांगता येत नाही.
यामध्ये कोण आघाडीवर आहे, हे देखील सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. तर प्रयोग करण्यासाठी अधिक पर्याय मिळायला हवेत, असे अमेरिकेतील वरिष्ठ तज्ञ डॉ. ऍन्थनी फॉसी यांनी म्हटले आहे. चीनमध्ये मार्चमध्ये झालेल्या पहिल्या चाचणीमध्ये फारच कमी उमेदवार मानवी चाचणीसाठी सहभागी झाले होते. मात्र आता चीन, अमेरिका, युरोपात वेगवेगळ्या चाचण्यांसाठी मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होण्यास उत्सुक आहेत.
जगाच्या ज्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव अधिक आहे तिथल्या लोकांना या प्रयोगात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. मात्र नागरिकांना घरात बसून रहायला सांगितले गेले आहे, त्यामुले त्यात अडचणी आहेत. सर्वसाधारणपणे असे औषध बनवण्यास अनेक वर्षे लागतात. पण आता जानेवारीपर्यंत हे औषध बनवण्याचे उद्दिष्ट संशोधकांपुढे आहे. हे उद्दिष्ट साध्य करणे शक्यही आहे, असे व्हाइट हाऊसमधील करोना व्हायरस टास्क फोर्सच्या समन्वयक डॉ. डेबोरा बिर्क्स यांनी सांगितले. सर्व काही अगदी व्यवस्थित झाले तर, 12 ते 18 महिन्यात लस तयार करण्याचा वेगाचा विक्रम होईल, असे डॉ. फौसी म्हणाले.
अमेरिका, चीन, ब्रिटन आणि जर्मनीमध्ये 8 ते 11 उमेदवारांवर औषधाच्या प्राथमिक चाचण्या केल्या जात आहेत. आणखी काही देशांमध्ये मे आणि जुलै दरम्यान मानवी चाचण्यांना प्रारंभ होईल. त्यामुळे मानवी चाचण्यांना उमेदवार कमी पडणार नाहीत, असे फिलाडेल्फियामधील मानवी चाचणीचे उमेदवार 33 वर्षीय अँथनी कॅम्पिसी यांनी सांगितले. उपचारासाठी अजूनही अनेक पद्धतींचे पर्याय पुढे येत आहेत. स्पाइक प्रोटीन नॅनो पार्टिकल्सपासून बनविलेली लस आणि अगदी नाकावाटे फवारण्याच्या स्प्रे सारखे पर्यायही पुढे येत आहेत. या चाचण्यांमुळे रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होत असल्याने आणखी उमेदवार या चाचण्यांमध्ये स्वतःहून सहभागी होत आहेत.