एअर इंडियाच्या विक्रीला वेग

बऱ्याच खरेदीदारांनी लावली बोली

नवी दिल्ली -एअर इंडिया कंपनी पूर्णपणे विकून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. यासाठी खरेदीदार निवडण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता या पात्र बोलीदारांकडून एअर इंडियाच्या किमतीसाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामध्ये टाटा समूहाचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. तांत्रिक प्रक्रियेसाठी टाटा समूहाबरोबरच देश-विदेशातील अनेक कंपन्यांनी भाग घेतला आहे. मात्र किती कंपन्या यासाठी पात्र झाल्या आहेत, हे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले नाही. आता तांत्रिक दृष्टया पात्र कंपन्यांना एअर इंडियाचा ताळेबंद अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे.

त्या आधारावर या कंपन्या आपली रक्‍कम सांगणार आहेत. सर्व बोलीचा विचार करून नंतर केंद्र सरकार कोणाला एअर इंडिया विकायचे याचा निर्णय येणार आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर 2019 पर्यंत संपण्याची शक्‍यता असल्याचे निर्गुंतवणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स या दोन कंपन्यांचे विलिनीकरण 2007 मध्ये करण्यात आले होते.
तेव्हापासून या कंपनीला तोटा होत आहे. आता या कंपनीतील आपले सर्व म्हणजे शंभर टक्के भागभांडवल केंद्र सरकार विकणार आहे. या अगोदर तांत्रिक बालीसाठी केंद्र सरकारने कंपन्यांना आवाहन केले होते.

मात्र दरम्यानच्या काळामध्ये करोना आल्यामुळे या प्रक्रियेला पाच वेळा मुदतवाढ द्यावी लागली आहे.
मात्र आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच एअर इंडियाची विक्री पूर्ण होईल असे निर्गुंतवणूक विभागाने म्हटले आहे. एअर इंडियाची स्थापना 1932 मध्ये टाटा समूहाने केली होती. मात्र नंतर या कंपनीचे सरकारीकरण करण्यात आले होते. सध्या या कंपनीवर प्रचंड कर्ज आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.