मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
दरम्यान यावर चित्रा वाघ यांनी माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या, या सरकारने हे सुडबुद्धीने केलेले आहे. याबाबत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती न देता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मी कायदेशीर लढा देण्यासाठी तयार आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.