जळगाव – गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेटवरील नावात दुरुस्ती करून देण्यासाठी मुख्याध्यापकाने 1 हजार रुपयाची लाच मागितल्याचा प्रकार जळगावात समोर आला आहे. ही लाच घेताना लाचखोर मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. या घटनेनंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
राजेंद्र भास्करराव पाटील, वय 55 (रा. भगवती हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) असे लाच घेतलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात पाटील यांच्या विरोधात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन 2021 मध्ये फिर्यादी यांचा मुलगा कविवर्य श्री ना. धों. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव येथून 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
हा विद्यार्थी मुळचा तरवाडे (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी आहे. निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे छापून आले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे मुख्याध्यापक पाटील यांनी 1 हजारांची लाच मागितली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाटील यांस त्यांच्या राहते घरी लाच घेताना रंगेहात पकडले. दरम्यान पोलिसांनी पाटील यांना अटक केली आहे.