पुणे- तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांचे नवे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करण्याची सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिली आहे. प्रथम फेरी घेण्यासाठी 20 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. याबाबतचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलैमध्ये नवे वेळापत्रक जाहीर केल्यावर परिषदेनेही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट यांसह विविध तंत्रशिक्षण विद्याशाखांच्या शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते.
परिषदेने आता पुन्हा एकदा वेळापत्रकात बदल केले आहेत. त्यानुसार प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेच्या दोन नियमित फेऱ्या प्रवेश नियमन प्राधिकरणांनी पूर्ण करायच्या आहेत.द्वितीय वर्षांपासून पुढील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून सुरू होईल.
असे आहे वेळापत्रक
* शैक्षणिक वर्षांची सुरुवात – दि. 1 सप्टेंबर
* प्रथम प्रवेश फेरी- दि. 20 ऑक्टोबरपूर्वी
* द्वितीय प्रवेश फेरी – दि. 1 नोव्हेंबरपूर्वी
* प्रथम सत्राच्या नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवात – दि.1 नोव्हेंबर
* प्रवेश रद्द करण्याची मुभा – दि.10 नोव्हेंबर
* रिक्त जागांवर प्रवेश – दि.15 नोव्हेंबरपर्यंत