शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास दोन वर्षे

करोना, लॉकडाऊनमुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा, निकाल लांबणीवर

– व्यंकटेश भोळा

पुणे – करोनामुळे सर्व शाळा व महाविद्यालये मार्चपासून बंद होती. लॉकडाऊनपूर्वीच बारावीची व दहावीचा एक विषय वगळता अन्य विषयांच्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. नंतर निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाला लॉकडाऊनमुळे उशीर झाला. एकूणच करोनामुळे शालेय शिक्षण विभागाचे सर्वच वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे परीक्षा, निकाल, प्रवेशप्रक्रियेस विलंब होणारच आहे. त्यामुळे शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास दोन वर्षे तरी लागणार असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

करोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागतील, असे शिक्षणमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर अन्य केंद्रीय बोर्डाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याने राज्य शिक्षण मंडळालाही परीक्षांबाबत निर्णय घेणे क्रमप्राप्त होते.

त्यानुसार अखेर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी बारावीची परीक्षा दि.23, तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले. बारावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावरून येत्या शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक किमान तीन-चार महिने पुढे जाणार असल्याचे अधोरेखित होत आहे.

अकरावीची प्रवेशप्रक्रिया आटोपशीर हवी
दहावीचा निकाल लेखी परीक्षेनंतर किमान अडीच महिन्यांनी लागणार आहे. या कालावधीचा विचार करता, अकरावी प्रवेशप्रक्रिया सप्टेंबरमध्ये सुरू होईल. अशा परिस्थितीत अकरावी प्रवेश समितीने ही प्रक्रिया वेळेत आणि आटोपशीर पूर्ण होण्यासाठी आतापासून नियोजन करणे आवश्‍यक आहे. महिनाभरात अकरावीची 90 टक्‍क्‍यांहून अधिक प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसे वेळापत्रक निश्‍चित करण्यासाठी शिक्षण विभागास प्रयत्न करावे लागणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा दि. 29 मे रोजी पूर्ण होत आहे. मात्र, निकालास जुलै-ऑगस्ट उजाडणार, हे मात्र मान्य करण्यासारखे नाही. करोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अशा कठीण परिस्थितीत किमान यंदाच्या वर्षी तरी दहावी-बारावी परीक्षांचे निकाल युद्धपातळीवर प्रयत्न करीत लवकर लावण्यास शैक्षणिक वेळापत्रक पूर्वपदावर येण्यास वर्षभराचा कालवधी लागणार नाही. निकाल जाहीर करण्यास मे आणि जून अशी दोन महिने पुरेसा कालावधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत काही कडक नियम तयार केल्यास किमान दीड महिन्यांत बोर्डाचे निकाल लागू शकतात. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्‍यक आहे.
– अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ज्ञ 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.