नांदेड : ‘कोरोना’ या विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या दृष्टिने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज येत्या ३ मे पर्यंत संपुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संलग्नित सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट यांना हा आदेश लागू राहणार आहे. या काळात प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालय न सोडता घरी बसूनच आवश्यक असेल ते प्रशासकीय कामकाज करावे, असे निर्देशही कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी दिले आहेत.
मा.पंतप्रधान महोदयांनी केलेल्या आवाहनानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या आदेशान्वये कोरोना’ (कोव्हीड-१९) या विषाणूचे देशभरातील वाढते संक्रमण रोखण्यासाठी विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरातील सर्व शैक्षणिक संकुल, सर्व संलग्नित महाविद्यालय, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली आणि कै.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, किनवट येथील सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज बंद राहणार आहे. येथील प्राचार्य, प्राध्यापक, संशोधक यांनी आपले घरी राहून (वर्क फ्रॉम होम) विभागाचे कामकाज करावयाचे आहे. पुढील सत्र, शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक साहित्य तयार करणे, संशोधन लेख, संशोधन पेपर व संशोधना संदर्भात इतर आवश्यक ते काम करावे.
विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त होईल असे प्रश्नसंच तयार करावे. त्याचप्रमाणे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत आवश्यक ते प्रकल्प तयार करावेत. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे. प्राचार्य, प्राध्यापकांनी तयार केलेले स्टडी मटेरियल सर्व विद्यार्थ्यांना ई-मेल, व्हॉटस् अॅप किंवा इतर माध्यमांद्वारे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतील. सर्व प्राध्यापकांनी घरी राहून केलेल्या कामाचा अहवाल संचालक, प्राचार्य यांना लिखित स्वरुपात द्यावयाचा आहे. आणि संकुलाच्या सर्व संचालकांनी सदर अहवाल एकत्रित करून त्याची माहिती कुलसचिव कार्यालयास सादर करावयाची आहे.