यापुढे 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार एसी

ऊर्जा बचतीसाठी सरकारचा नवा नियम

नवी दिल्ली : नवीन एसी खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण नवीन एसी आता 24 डिग्री सेल्सियस तापमानावर सुरू होणार आहे. सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या एसीमध्ये डिफॉल्ट तापमान 24 अंश फिक्‍स केलेले असेल. ऊर्जा बचतीसाठी नियम बनवणारी संस्था, ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सीने (बीईई) सरकारसोबत मिळून एनर्जी परफॉर्मंस स्टॅंडर्ड निश्‍चित केले आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

नव्या वर्षात नव्या सेटिंगसोबतच एसीचे मॅन्युफॅक्‍चरिंग केले जाईल. बीईईकडून स्टार रेटिंग मिळवणाऱ्या सर्व रूम एअर कंडिशनर्ससाठी 24 डिग्री ही डिफॉल्ट सेटिंग अनिवार्य करण्यात आली आहे. हे नवीन नियम 1 जानेवारी 2020 पासून लागू झाले आहेत. नव्या नियमांनुसार, एसी सुरू केल्यानंतर डिफॉल्ट सेटिंग 24 अंश असेल, पण नंतर तुमच्या सोयीप्रमाणे तापमान तुम्ही कमी-जास्त करु शकतात. ऊर्जा बचतीसाठी सरकारने हा नवा नियम आणला आहे.

बीईईने फिक्‍स्ड स्पीड रुम एअर कंडिशनर्ससाठी 2006 मध्ये स्टार लेबलिंग प्रोग्राम लॉंच केला होता. हा प्रोग्राम नंतर 12 जानेवारी 2009 मध्ये अनिवार्य करण्यात आला होता. यानंतर 2015 मध्ये इनव्हर्टर रुम एअर कंडिशनर्ससाठी वॉलंटरी स्टार लेबलिंग प्रोग्रामलॉंच केला. हा प्रोग्राम नंतर 1 जानेवारी 2018 रोजी लागू झाला. रूम एअर कंडिशनर्ससाठी स्टार लेबलिंग प्रोग्रामने 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 4.6 अब्ज युनिट ऊर्जेची बचत केली. इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीच्या रिपोर्टनुसार, वर्ष 2050 पर्यंत जगभरात एसीची सर्वाधिक मागणी भारतात असेल. तर या रिपोर्टनुसार, भारतानंतर एसीची सर्वाधिक मागणीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर इंडोनेशिया असणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)